Pinned Tweet
जाऊ तिथं इडली खाऊ...
मी कधीही, कुठेही, केव्हाही, वेळ-काळ-स्थळ- प्रसंग या कशाचीही तमा न बाळगता इडली बिनधास्त खाऊ शकतो...
बाहेर असताना मला भूक लागली की पहिला पदार्थ निवडतो तो 'इडली'
चायनीजची चमकोगिरी, पाव आणि पुऱ्यांचा उपमर्द या सर्वांच्या पलीकडे मला पांढऱ्या शुभ्र इडलीचा साधेपणाच जास्त आवडतो...
ई-मुद्रा! काल पासून बातम्यांमध्ये हे नाव ऐकून हा तांत्रिक गोंधळ नीट उमगला नाही, त्यांच्यासाठी ही सोपी माहिती.
आपण संगणकावर कुठलीही वेबसाइट उघडली तर डाव्या बाजूला कोपऱ्यात एक कुलूपाचे चित्र दिसते, ते हिरवे असेल तर समजते की हे संकेतस्थळ सुरक्षित आहे. हे फोनच्या ब्राऊजरमध्येही बघता येते. एखाद्या बँकेचे संकेतस्थळ उघडून बघा. हे हिरवे कुलूप म्हणजे त्या वेबसाईटचे सर्टिफिकेट. एखाद्या वेबसाईटचे कम्युनिकेशन सुरक्षित आहे हे ते सर्टिफिकेट दर्शवते.
हे सर्टिफिकेट (याला SSL/TLS Certificate म्हणतात) म्हणजे त्या त्या वेबसाईटचे ओळखपत्र म्हणता येईल. प्रत्येक संकेतस्थळाला हे ओळखपत्र प्रदान करायचा अधिकार असलेल्या जगमान्य संस्थांना 'सर्टिफिकेट ऑथॉरिटी' म्हणतात, आणि ई-मुद्रा ही अशीच एक संस्था. ती हे ओळखपत्र (सर्टिफिकेट) वितरित करते.
हे सर्टिफिकेट वितरित करताना ई-मुद्रा सारख्या संस्थांना एक 'प्रायव्हेट की' (Private key) आवश्यक असते. ही की वापरुन ते वेबसाईटचे सर्टिफिकेट तयार करतात. ही 'की (Key)' गुप्तपणे तयार केली जाते आणि कधीही उघड केली जात नाही. जसे एखाद्या अधिकृत कागदपत्रांवर शिक्का मारला जातो, तो शिक्का पाहून समजते की एखाद्या अधिकृत व्यक्तीने हा कागद तयार केला आहे, त्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो. तसे ही 'प्रायव्हेट की' काम करते.
ही प्रायव्हेट की जोपर्यंत गुप्त आणि मजबूत आहे तोपर्यंतच तिने तयार केलेल्या 'सर्टिफिकेट' वर विश्वास ठेवता येतो. आपण पासवर्ड जसा 'स्ट्रॉंग' हवा म्हणतो तशी ही प्रायव्हेट की 'स्ट्रॉंग' असायला हवी तरच ती उघड होणार नाही. ही की एक प्रोग्राम वापरुन कुणालाही ओळखता येणार नाही अशी ऑटोमॅटिक तयार केलेली असते.
आता नेमकं बिघडलं काय?
एप्रिल २०२५ मध्ये ई-मुद्राने काही सर्टिफिकेट तयार केले होते. पण ते तयार करणाऱ्या स्क्रिप्टमध्ये चूक झाली आणि ही प्रायव्हेट की अत्यंत कमकुवत तयार झाली. ती की कुणालाही सहज ओळखता येईल अशी. त्यामुळे ही प्रायव्हेट की वापरुन कुणीही खोटे सर्टिफिकेट तयार करू शकेल.
हे बनावट सर्टिफिकेट वापरुन तो कुठलीही वेबसाईट सुरक्षित आणि खरी आहे असे दर्शवणे सहज शक्य होते. म्हणजे एखाद्या बँकेच्या नावाने बनवलेल्या खोट्या वेबसाईटवरही ते कुलूप हिरवे दिसले असते आणि त्यातून फसवणूक करता आली असती.
पण इथे थोडा दिलासाही आहे. जगातील बहुतांश ब्राऊजरने ह्या प्रायव्हेट की ने तयार केलेली सर्टिफिकेट आधीच ब्लॉक केली आहेत. त्यामुळे आता हे सर्टिफिकेट वापरणाऱ्या वेबसाईट सामान्य ब्राऊजर मध्ये उघडणारच नाहीत. उघडल्या तरी त्यांवर सूचना लिहून येईल.
मग धोका उरला कुठे? ब्राउझरच्या बाहेर. आपल्या फोनमधली अनेक ॲप्स, जुनी उपकरणं, कंपन्यांची अंतर्गत सॉफ्टवेअर्स ही सार्वजनिक ब्राऊजर वापरत नाहीत, त्यांची अंतर्गत सर्टिफिकेट वापरण्याची सोय केलेली असते. म्हणूनच गो, पायथन, रस्ट, इलेक्ट्रॉन अशा प्रोग्रॅमिंग जगतातल्या मंडळींनी तातडीने अपडेट्स काढले आहेत.
ज्यांच्या संकेतस्थळाचं प्रमाणपत्र ई-मुद्राच्या या रूटवर आधारित आहे, त्यांना ते लगेच बदलावं लागणार आहे, नाहीतर त्यांचं संकेतस्थळ ब्राउझरमध्ये उघडणारच नाही.
आपण सामान्य माणसांनी काय करायचं? फार काही नाही. फोन, ब्राउझर आणि ॲप्सचे अपडेट्स 'नंतर करू' म्हणून पुढे ढकलू नका. सार्वजनिक वायफायवर बँकेचे व्यवहार शक्यतो टाळा. आणि एखाद्या वेबसाइटवर ब्राउझरने "हे कनेक्शन सुरक्षित नाही" असा इशारा दिला, तर तो दुर्लक्षित करून पुढे जाऊ नका. तो इशाराच तुम्हाला वाचवत असतो.
या प्रकरणातून एकच शिकायला मिळते. सायबर सुरक्षेचे गडकिल्ले मोठमोठ्या भिंतींवर उभे केलेले असतात, पण सुरक्षेचे हे गड कोसळतात ते एका छोट्याशा चुकीमुळे. कुलूप कितीही भक्कम असो, चावीच कमकुवत असेल तर आपलं घर सुरक्षित नसते.
समृद्धीवर कंटेनरला मागून धडकून अपघात होण्याचे प्रकार का होतात याचे उदाहरण.
स्पष्ट दिसावे म्हणून दुसरी चित्रफित झूम केलेली आहे.
नजीकच्या काळात समृद्धीवर झालेले अपघात हे याच एका मूर्खपणातून झालेले आहेत.
समोरची गाडी ओव्हरटेक करत असेल तर हळू चालत असेल, आपण गाडी हळू करून सुरक्षित अंतर राखावे, तिचं ओव्हरटेक पूर्ण झाल्यावर आपण पुढे निघावे.
हे असले आर्दाड एक सेकंदही गाडी हळू करण्याच्या मनस्थितीत नसतात आणि मग इतरांचा जीव धोक्यात टाकतात.
120+ या स्पीडवर समोरच्या गाडीला खेटून चालवणारे कित्येक मी पाहिलेत, त्यानंतर हे दुसरे बैलबुद्धी जे अचानक तिसऱ्या लेन मध्ये शिरतात.
तुम्ही कितीही सुरक्षित गाडी चालवा, पण हे असले अक्कल गहाण टाकलेले ड्रायव्हर कधी कुणाच्या जीवावर उठतील सांगता येत नाही.
फ्रान्समध्ये एक विचित्र सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सनी कुणाचा पासवर्ड चोरला नाही की बँक खाते रिकामे केले नाही... त्यांनी चक्क सुमारे ४५० सुपरमार्केटमधले फ्रिज 'हॅक' केले.!
हॅक झाल्यावर हॅकर्सनी इंटरनेटला जोडलेल्या या फ्रिजचे तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत वाढवले. दूध, मांस, फळे, फ्रोजन फूड सगळे खराब झाले. काही ठिकाणी तर आगही लागली.
आपण 'सायबर हल्ला' म्हटले की डोळ्यासमोर कॉम्प्युटर, मोबाईल आणि डेटा चोरी येते. हे झाले आयटीचे, म्हणजे माहितीचे जग. पण आणखी एक जग आहे, ओ.टी. (OT Operational Technology), म्हणजे ऑपरेशनल टेक्नॉलॉजी.
ही यंत्रणा प्रत्यक्ष भौतिक जगात काम करते. वीज केंद्रातील टर्बाइन, पाणी शुद्धीकरण केंद्रातील पंप, कारखान्यातील मशीन, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा, कनेक्टेड वाहनं आणि हो, सुपरमार्केटचे फ्रिजसुद्धा.
फरक साधा आहे. आयटीवर हल्ला झाला तर 'डेटा' जातो. ओटीवर हल्ला झाला तर वस्तू नासतात, यंत्रे थांबतात आणि कधी कधी माणसांचे जीव धोक्यात येतात. २०१५ मध्ये युक्रेनमध्ये अशाच सायबर हल्ल्याने ऐन डिसेंबरच्या थंडीत सव्वा दोन लाख ग्राहकांची वीज गेली होती.
फ्रान्समध्ये संशोधकांना ७,४०० हून अधिक तापमान नियंत्रण यंत्रणा इंटरनेटवर असुरक्षित अवस्थेत सापडल्या होत्या. म्हणजे दार उघडेच होते, कुणीतरी संधि साधून आत येण्याचीच वाट पहायची होती.
आपल्याकडेही कारखाने, वीज, पाणी आणि रुग्णालये झपाट्याने 'स्मार्ट' होत आहेत. स्मार्ट होणे चांगलेच आहे. पण सुरक्षित नसलेले स्मार्टपण म्हणजे चोराच्या हातात दिलेली घराची चावी.
त्यामुळे सायबर सुरक्षेत या 'ओ.टी. सेक्युरिटी' ला महत्व वाढत आहेत. कारण बहुतेक कारखाने आणि इतर यंत्रणा आजकाल कनेक्टेड होत आहेत. एवढेच काय आपल्या घरगुती वापरातल्या अनेक गोष्टी आज स्मार्ट आणि कनेक्टेड आहेत. त्यांनाही हॅकिंगचा धोका आहेच.
आयटी हॅकिंग मुळे डेटा गेला तर एकवेळ बॅकअपमधून परत मिळवता येतो. पण जळालेले गोदाम, निर्मिती थांबलेले ऊर्जा प्रकल्प आणि हॉस्पिटल मध्ये हॅकिंग मुळे गेलेला जीव परत येत नाही.!
#सायबरसुरक्षा
गेल्या दोन-तीन वर्षांत मी दक्षिणेतली अनेक मंदिरं फिरलो, आणि त्यांच्या स्थापत्यशैलीच्या प्रेमातच पडलो आहे.!
आकाशाला भिडणारी भव्य-दिव्य गोपुरं, भलेमोठे प्रशस्त मंडप, दगडात जिवंत झालेलं कोरीवकाम, नजर पोहोचेल तिथवर पसरलेला मंदिरांचा परिसर...
नयन दिपून जातात, त्यांचं वर्णन करायला शब्दही थिटे पडतात.
चोळ, पाण्ड्य, विजयनगर आदी साम्राज्यांनी काय संपन्नता, समृद्धी पाहिली असेल..!
माणसाने प्रवास करत रहावे, प्रवास केल्याने एका वेगळ्या जगाचा उलगडा होत राहतो.
दोन दिवस झाले मी चेन्नईत आहे. आणि इथे मलाही काही नवीन गोष्टी कळल्या, ज्या कदाचित इथे आलो नसतो तर कधी उलगडल्या नसत्या.
चेन्नईचा जुना भाग आहे, Mylapore. इथल्या प्रसिद्ध कपालेश्वर मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या बाजारात 'गोलू बोम्मई' पाहिले. आपल्या पुराणांतील देवी देवता, पुराणांतील दृश्ये चित्रित करणाऱ्या मातीच्या मूर्ती.
आपण गणपती मध्ये करतो तसे इथे नवरात्रीत या मूर्ती पायऱ्यांवर एकावर एक रचून त्यांची आरास मांडली जाते अशी इथली प्रथा.
इथली ही परंपरा नव्यानेच माहित झाली. त्या सुंदर आखीव रेखीव मूर्ती, काही रामायण, महाभारतातील दृश्ये, कुठे श्रीकृष्ण, कुठे गणपती, शंकराचार्य, दक्षिणेतील संत अशा रंगीबेरंगी सुंदर सुबक मूर्तींनी संपूर्ण बाजार सजला होता.
दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीत सगळा बाजार नवख्या तरुणीसारखा हळू हळू सजू लागला होता.
मातीच्या त्या बाहुल्यांकडे पाहताना एक गंमत जाणवली. भाषा वेगळी, पेहराव वेगळा, सण साजरा करण्याची पद्धत वेगळी, पण त्या मूर्तींमधला राम तोच, कृष्ण तोच आणि गणपतीही तोच! आपल्याकडे जो बाप्पा दहा दिवसांसाठी घरी येतो, तोच इथे नवरात्रीच्या पायरीवर बसून गालातल्या गालात हसत असतो. ताट वेगळं, पण नैवेद्य तोच.
आपल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात अगणित रंग आहेत, आणि हे रंग त्या भूमीत प्रत्यक्ष पाय ठेवल्यावरच उलगडतात.
पुस्तकातला भारत म्हणजे मिटलेली कळी, प्रवासात ती फुलासारखी उमलते आणि तिचा सुगंध फक्त तिथे पोहोचलेल्यालाच येतो. म्हणूनच मला प्रवास करायला आवडतो.!
केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार,
शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार...
इंग्रजीच्या प्रभावामुळे साधे सोपे नेहमीच्या वापरातले मराठी शब्द आपण विसरत चाललो आहेत.
किती वाजलेत या दोन सोप्या शब्दांची जागा "टाईम" काय झाला ने कधी घेतली कळलंच नाही. आठवड्याचे वार आता सोमवार, मंगळवार नसतात तर मंडे, ट्युजडे...
तुमच्या वापरात असे कोणते साधे मराठी शब्द आहेत ज्यांची जागा आता इंग्रजी शब्दांनी घेतली आहे.
माणसाला समोसे थंड झालेले आवडत नाही, आणि कढईतून गरमगरम काढलेले खाता येत नाही. आपल्या मनाचे चोचले फार विचित्र आहेत.
हे आवडत नाही, ते जमत नाही, असं नको, तसंच पाहिजे वगैरे वगैरे...
काल शेगडीच्या जाळ्या काढून, शेगडी उचलून त्याखाली पाणी फिरवून सगळं सांडलेलं दूध जेव्हा स्वच्छ करावं लागलं, तेव्हा समजलं, दूध उतू गेल्यावर आई ओरडायची का ते...
उगाच नाही घरातल्या आई, धावत जाऊन दुधाचा गॅस बंद करत.... विषय दुधाचा नाहीच आहे खरं तर...
एक्स काय किंवा कुठलाही सोशल मिडिया तुम्हाला वापरायचा असेल तर एक अस्त्र कायम जवळ बाळगून रहा,
"दुर्लक्ष"
इथल्या काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायला शिकलो की आपोआप इथला प्रवास सुखाचा होतो...
इथे येऊन सुखी समाधानी राहण्याचा हा कानमंत्र आहे...
मराठवाडा मुक्तिसंग्राम - लेख ५ - ऑपरेशन पोलोच्या नोंदवहीतली अल्पज्ञात पानं - समारोप
मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गोष्ट सांगताना आपण नेहमी १३ ते १७ सप्टेंबर या पाच दिवसांवर थांबतो. पण या पाच दिवसांच्या नोंदवहीत काही अशी पानं आहेत, ज्याची फारशी चर्चा होत नाही. अशा काही पानांची नोंद आज आपण घेऊया.
ऑपरेशन पोलोच्या आधी केलेले ऑपेरेशन कबड्डी
ऑपरेशन पोलो सुरू होण्याआधी सरहद्दीवर एक वेगळीच कारवाई चालू होती. निजामी हद्दीतून हैदराबादचे सैन्य आणि रझाकार भारतीय हद्दीत घुसून हल्ले आणि लुटमार करत होते. त्यांचा बंदोबस्त करावा आणि सीमांचे रक्षण करावे या हेतूने भारतीय लष्कराला असा आदेश देण्यात आला होता की जिथून हल्ले होतात तिथपर्यंत जावे, मुळावर आघात करावा आणि परत यावे.
या कारवाईला लष्कराने जे नाव दिले, ऑपरेशन कबड्डी. सैन्य लहान लहान तुकड्यांत विभागून, गरज पडल्यास सरहद्द ओलांडून पुन्हा परत यायचे, आणि म्हणूनच या संपूर्ण कारवाईला तुकडीने 'कबड्डी' असे सांकेतिक नाव दिले.
पुढे प्रत्यक्ष कारवाईचे नाव ठरले ऑपरेशन पोलो, आणि ती संपल्यानंतर तिचा उल्लेख 'कॅटरपिलर' या नावाने केला गेला.
"मी तुम्हाला पोलीस पाठवू शकत नाही, पण वीस रझाकार पाठवतोय"
रझाकार ही केवळ एक खाजगी संघटना असून सरकारचा तिच्याशी काडीचाही संबंध नाही, असा आभास हैदराबाद प्रशासनाकडून निर्माण केला जात होता. परंतु, भारतीय सैन्याच्या हाती लागलेल्या एका डी.एस.पी.च्या पत्राने या लबाडीचा बुरखा पार फाडून टाकला. "I can send you no policemen but I am sending you 20 Razakars"
हे पत्रातील वाक्य म्हणजे निजामी शासन, पोलीस यंत्रणा आणि हिंसक रझाकार यांच्यातील अभद्र युतीचे उघडेनागडे वास्तव वेशीवर टांगणारी जिवंत साक्ष होती.
निजामाची खरी ताकद किती होती?
ऑपरेशन पोलोचे प्रमुख जनरल चौधरींनी हैदराबादच्या लष्करी ताकदीची यादी दिली आहे. नियमित सैन्य बावीस हजार, अनियमित तुकड्या दहा हजार, सशस्त्र अरब दहा हजार, पैगा फौजा आणि सशस्त्र पोलीस मिळून दहा हजार, आणि रझाकार दोन लाख.
यात आणखी एक भर होती. ऑस्ट्रेलियन हस्तक सिडने कॉटन कडून निजामाने बरीच शस्त्रे आणि दारूगोळा मिळवला होता. त्या यादीत हजार रणगाडाविरोधी सुरुंग, दोन आणि तीन इंची मोर्टार, अडीच हजार बॉम्ब, ब्राउनिंगचा पाच हजार दारूगोळा, पाचशे स्फोटक गोळे, दोन विमानविरोधी तोफा आणि सहा रणगाडाविरोधी तोफा यांचा समावेश होता.
भारतीय बाजूनेही तयारी तशीच होती. लष्कराची विभागणी पाच गटांत करण्यात आली होती, ज्यांची नावे होती स्ट्राईक फोर्स, स्मॅश फोर्स, किल फोर्स, वीर फोर्स आणि रिअर फोर्स.
एका संस्थानाला संपवायला दुसऱ्या संस्थानांच्या फौजा
आपला असा एक समज असतो की ऑपरेशन पोलोची संपूर्ण कारवाई केवळ भारतीय लष्करानेच पार पाडली. परंतु, या मोहिमेत विविध संस्थानांच्या सैन्यांनी देखील थेट भाग घेतला होता.
रणांगणावर प्रत्यक्ष उतरलेल्या फौजांमध्ये ग्वाल्हेर लान्सर्स, म्हैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, ग्वाल्हेर इन्फंट्री, म्हैसूर इन्फंट्री आणि कोल्हापूरची राजाराम रायफल्स यांचा सहभाग होता. याशिवाय, बडोदा इन्फंट्री, त्रावणकोर इन्फंट्री आणि जोधपूर इन्फंट्री या तुकड्यांनी अप्रत्यक्षरीत्या मोलाचे सहकार्य केले होते.
थोडक्यात सांगायचे तर, एका संस्थानातील जुलमी राजवटीचा अंत करण्यासाठी इतर अनेक संस्थानांची सैन्ये एकत्र येऊन लढली होती.
भूमिगत चळवळीचे स्वतःचे युद्धयंत्र
स्टेट काँग्रेसच्या कृती-समितीला लष्करी कारवाईची पूर्वकल्पना होती. संपूर्ण संस्थानाचे 'ॲक्शन इनचार्ज' डॉ. मेलकोटे यांनी ३१ जुलै १९४८ रोजी confidential circular no. 13 द्वारे निवडक कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध युनिट्स उभारण्याचे निर्देश दिले.
यानुसार औरंगाबाद (मध्यप्रांत) ५०, नांदेड व परभणी प्रत्येकी १२५, मुंबई सरहद्दीवरील औरंगाबाद व बीड प्रत्येकी ७०, अंबेजोगाई ४० आणि उस्मानाबादसाठी १५० कार्यकर्ते निश्चित केले गेले. वाढत्या अत्याचारांपासून संरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा केंद्राला त्वरित १,००० हातबॉम्ब पाठवण्याचे सांगण्यात आले.
पुढील परिपत्रकात या कार्यकर्त्यांना हेरगिरी, हल्ले, पोलिसिंग व पेट्रोलिंगचे प्रशिक्षण देण्याची सोय केल्याचे कळवले गेले. या ऑपरेशन पोलोची तयारी केवळ भारतीय सैन्याकडूनच नव्हे तर अंतर्गत स्टेट काँग्रेस आणि लढ्यात इतर सहभागी सर्वांनीच चालवली होती.
औरंगाबादच्या प्राध्यापक इब्राहीम आणि त्याचा वेडगळपणा
१५ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय लष्कराने औरंगाबाद शहरावर कब्जा केला. त्याच दिवशी या शहरात एक विलक्षण आणि अस्वस्थ करणारा प्रसंग घडला.
भारतीय सैन्य औरंगाबादेत आले असताना, रझाकारांनी शरणागतीचा पांढरा ध्वज दाखवून त्यांना जाळ्यात अडकवण्याचा कट रचला, पण सैन्याने तो उधळून लावला.
यानंतर, औरंगाबादच्या इंटरमीजिएट कॉलेजमधील इतिहासाचा प्राध्यापक इब्राहीम याने विद्यार्थ्यांच्या हातात भाले देऊन त्यांना भारतीय रणगाड्यांसमोर उभे केले. समोर भारतीय सैन्याचे रणगाडे असताना हातात भाले आणि दगड घेऊन लढण्याची तयारी म्हणजे निव्वळ वेडगळपणा होता.
भारतीय अधिकाऱ्याने मुलांना परिस्थिती समजावून सांगून जीव वाचवण्याचा सल्ला दिला. यानंतर बहुतांश मुले पळून गेली, तर काही पुढे गेली. विद्यार्थ्यांना मृत्यूच्या तोंडी ढकलणारा प्राध्यापक इब्राहीम स्वतः पळून जाताना पकडला गेला.
खोट्या बातम्यांच्या आडून दाखवलेला लष्करी पोकळपणा
नळदुर्गच्या घटनेत उल्लेखलेल्या दिवशी, १४ सप्टेंबरच्या सकाळी उमरग्याहून कूच करणाऱ्या सैनिकी तुकडीला जनरल चौधरींचा तातडीचा निरोप मिळाला, “कुठेही न थांबता वेगाने पुढे चालत राहा!
यामागील पार्श्वभूमी नंतर स्पष्ट झाली. जनरल चौधरींनी हैदराबाद रेडिओवरील बातमी ऐकली होती; त्यात दावा केला गेला होता की, "आम्ही जोरदार प्रतिकार केला, परंतु शेवटी आम्हाला 'तळमूड' सोडावे लागले आणि त्यावर भारतीय सैन्याने ताबा मिळवला."
वास्तविक पाहता तेव्हा भारतीय सैन्याने तळमूड घेतलेलेच नव्हते. मात्र, या खोट्या बातमीमुळे भारतीय सैन्याला तात्काळ ती परिस्थिती प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळाली.
स्वतःच्याच खोट्या प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकून निजामी सैन्य आतून कसे ढासळले, याचे हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे.
१३ सप्टेंबर १९४८ रोजी पहाटे चार वाजता सुरू झालेली ही वादळी कारवाई १७ सप्टेंबरच्या सायंकाळी ५ वाजता निजामाच्या औपचारिक शरणागतीने शमली. शेकडो वर्षांची जुलमी घराणेशाही आणि अढळ वाटणारा असफशाहीचा तख्त अवघ्या १०९ तासांत पत्त्यांच्या बंगल्यासारखा पुरता कोसळला.
अथांग संपत्ती, अनियंत्रित सत्ता आणि रझाकारांच्या हिंसक ताकदीच्या अहंकारावर उभा असलेला निजामाचा साम्राज्यदुर्ग अखेर भारतीय सैन्याच्या निग्रहापुढे धुळीस मिळाला. ज्या हैदराबाद संस्थानाचा सूर्य कधी मावळणार नाही असे निजाम समाजात होता, त्या जुलमी राजवटीचा अस्त मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदानाने घडवून आणला.
इतिहासाच्या पुस्तकांत केवळ विजय आणि तारखांची नोंद उरते; पण एका लढ्याचे खरे मोल त्याच्या नैतिक चारित्र्यात असते. सामाजिक चळवळीतून होत गेलेली जनजागृती, हळू हळू उभा राहिलेला लढा, अनेक लहान मोठ्या लढाया, सत्याग्रहांची मालिका, अनेकांना आलेले हौतात्म्य, शेवटाला घडत आलेला प्रचंड रक्तपात, या सर्व पानांतूनच असफशाहीच्या राखेतून स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची नवी पहाट उगवली.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाची धगधगती गाथा सांगताना इतिहास नेहमी १३ ते १७ सप्टेंबर या केवळ १०९ तासांच्या वादळी पटावर येऊन स्थिरावतो. पण विजयी आरोळ्या आणि तारखांच्या गर्दीमागे या रक्तरंजित संघर्षाची अशी अनेक धुळीने माखलेली पानं दडली आहेत, ज्यांवरचा काळोख अजून पूर्णपणे हटलेला नाही. निजामाची दडपशाही, रझाकारांचा नंगानाच आणि स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेला मराठवाडा या संपूर्ण प्रवासाच्या नोंदवहीत अशी कित्येक मौन दालनं आहेत, जी आज पुन्हा एकदा उघडून पाहण्याची गरज आहे.
याच काही अल्पप्रचलित पानांचा उलगडा करण्याचा माझा प्रयत्न या लेखमालिकेतून मी केला. मी आपल्यापर्यंत नवीन माहिती पोचवू शकलो असेल मी मानतो.
धन्यवाद.
विराम
– आशुतोष
संदर्भ: हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा, अनंत भालेराव
हैदराबाद मुक्ति दिनाच्या शुभेच्छा, मुक्ति लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या त्या ज्ञात-अज्ञात-अनाम वीरांना अभिवादन 🙏🙏
नारायणराव पवार : ज्याने थेट निजामावरच बॉम्ब फेकला
हैदराबाद स्टेट, निजामाच्या हैदराबाद राज्यात अत्याचारांचे स्तोम माजले होते ह्यात दुमत नाहीच. सर्वच गोष्टींत दडपशाही, लोकांचे अनन्वित छळ, हिंदूंच्या धार्मिक गोष्टींवर बंदी, रझाकारांचे अत्याचार या गोष्टींमुळे जनतेत असलेल्या यत्किंचितही तमा नसलेला सातवा निजाम मीर उस्मान अली खान आपली ऐषोआरामाची जिंदगी जगत होता.
वर्षानुवर्षे हे अत्याचार होत असताना राज्यातली बहुसंख्य हिंदू जनता घरात पळी पंचपात्रे वाजवत बसली असेल का? निजामाने आयुष्यात किमान एक क्षण ह्या गोष्टीचा विचार केला असता तर इतिहासातील एक मोठा रक्तपाती संघर्ष टळला असता. पण निजामाने त्याच्या ऱ्हासाची कहाणी स्वतःच्या जुलुमी कर्मांनीच लिहिली होती.
नारायणराव पवार, मूळचे वारंगलचे. वारंगल इथेच इंटरचे शिक्षण पूर्ण झाल्यावर कायद्याचे (लॉ) चे शिक्षण घ्यायला हैदराबाद येथे आले. हैदराबादे राज्यात आर्य समाजाचा प्रभाव होताच, नारायराव देखील आर्य समाजी. १९४६ साली त्यांनी हैदराबादेत जिन्नाचे भडकावणारे भाषण ऐकले आणि त्यांनी जागीच “स्वाभिमानाशिवाय जगणे, हे मरणच” असा विचार करून आपले आयुष्य स्वराज्यासाठीच अर्पण करण्याचा त्यांनी निश्चय केला. बालकिशन, गुंडाईय्या आर्य. जगदीश आर्य अशा मित्रांसोबत मिळून देशकार्यात सहभागी झाले.पण नेमके करायचे काय ते सुचेना.!
एके दिवशी नयापूलजवळ त्यांनी पाहिले, रोज सायंकाळी निजाम त्याच्या किंग कोटी राजवाड्यातून बाहेर पडे, आपल्या आईच्या कबरीवर फुले वहायला. त्याच्यासाठी पोलीस रस्ते अडवत. हे पाहताच त्यांच्या डोक्यात एक आग उसळली. ह्या निजामालाच संपवून टाकायचं! लक्षावधी लोकांवर कित्येक दशके चाललेल्या अत्याचाराचं हे विषारी झाड मुळासकट उपटून टाकायचं. झाले, ठरले.
नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा” या उक्तीवरून प्रेरित होऊन, हे तरुण तयारीला लागले. जागेची पाहणी केली गेली. मुंबईस जाऊन बॉम्ब आणले गेले. सोलापुरातून पिस्तूल आणि विषाच्या बाटल्या मिळवल्या. जगदीश आर्य, गुंडय्या आणि नारायणराव हे १९-२० वर्षांचे तिघे तरुण सज्ज झाले, निजामाचा वध करायला.
४ डिसेंबर १९४७, अवघा भारत नव-स्वातंत्र्यचा सुवर्णकाळ उपभोगत असताना, हे तीन तरुण भारताच्या मध्य मध्यभागात उगवू पाहत असणाऱ्या एका छोट्या पाकी विषवल्लीला अंत करायला सज्ज होते. हाती बॉम्ब, बॉम्ब फेकण्यात चूक झाली तर पिस्तूल आणि पकडले गेलो तर विषाच्या बाटल्या घेऊन हे तीन तरुण एका गल्लीच्या तोंडाशी उभे राहिले. ‘किंग कोटी’ हैदराबादच्या मध्यवस्तीत असलेल्या, “किंग कोटी” मधून निजामाची चारचाकी बाहेर येताच नारायणरावांनी त्यांची सायकल भिंतीला टेकवली, आणि बॉम्बची पिन काढून थेट निजामाच्या गाडीच्या दिशेने भिरकावला. अलबत, एक मोठा आवाज झाला, बॉम्ब फुटला, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, गोंधळ माजला पण निजामाची गाडी चुकून सुरक्षित बाहेर निघाली. निजाम वाचला, नारायणरावांनी पिस्तूल काढले, गोळी चालणार तोच जवळच्या पोलिसाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडले. निजाम वाचला…!
पोलिसांच्या हाती लागलेल्या, जागेवरच प्रचंड मारहाण झालेल्या नारायणरावांवर निजामाच्या इस्लामी पोलिसांच्या हाती काय अत्याचार झाले ह्याचे वर्णन करायला नकोच. नशिबाने निजाम वाचला खरा, पण त्याची ती क्रूर गादी फार काळ टिकू शकली नाही. नारायणरावांनी फेकलेला तो बॉम्ब निजामवरच नाही, तर तो बॉम्ब हैदराबाद च्या जुलुमी राजवटीवर होता. नारायणरावांसारख्या शूर वीर तरुणांच्या पराक्रमाचे फलावसान झाले ते हैदराबाद राज्याचा कायमचा अंत होण्यामध्ये. पुढच्या दहा महिन्यांतच निजामाचे साम्राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आणि तो केवळ नावाचा निजाम राहिला. फाशीची शिक्षा झालेले नारायणराव हैदराबाद स्वातंत्र्यानंतर सुटकेतून कायमचे मुक्त झाले.
निजाम, रझाकार, रझवी यांच्या अत्याचारांनी रक्तरंजित हैदराबाद मराठवाड्याच्या भूमीला नारायणरावांसारख्या तरुणांच्या पराक्रमाने स्वातंत्र्याचे पावित्र्य मिळवून दिले. त्या तेजस्वी तरुणाईने जुलमी राजवटीची पाळेमुळे खणून काढली. त्यांच्या धडाडीने प्रत्येक मनात क्रांतीची ज्योत पेटवली. तलवारीच्या धारेने त्यांनी अन्यायाचा अंधार चिरला आणि स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. त्यांच्या शौर्यापुढे निजामाचे साम्राज्य निष्प्रभ ठरले. अशा या वीरांच्या बलिदानानेच हैदराबाद मुक्त झाले.
नारायणरावांच्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्याचे ब्रीद सांगितले
"सर कटा सकते है, लेकिन सर झुका सकते नही"
- आशुतोष
#मुक्तिलढा #मुक्तिसंग्राम #मराठवाडा
मराठवाडा मुक्तिसंग्राम - लेख ४ - वंदे मातरम
"वंदे मातरम" हैदराबाद संस्थानात हे दोन शब्द उच्चारणे म्हणजे देशद्रोह ठरवला जात असे. अख्ख्या हिंदुस्तानात नाद घुमत असलेल्या या वंदे मातरम गीताची निजामाला मात्र वेगळीच धास्ती होती.
वंदे मातरम म्हणजे 'जातीय गीत' आहे असा शिक्का मारून त्यावर बंदी घातली. वंदे मातरम वर बंदी घालताना निजामाला वाटत होतं की आपण एका गीतावर बंदी घालतोय, पण त्याला पुसटशीही कल्पना नसावी की त्याने त्याच्या साम्राज्याला भस्मसात करणाऱ्या एका अग्निकुंडाला जन्म दिला आहे.
१९३८ हे वर्ष हैदराबाद मुक्तिसंग्रामाला एक कलाटणी देणारे वर्ष मानले जाते. एकाच वेळी तीन तीन वेगळे सत्याग्रह यावर्षी घडले, त्यातील सर्वप्रचलित आंदोलन म्हणजे "वंदे मातरम चळवळ". ही विद्यार्थ्यांची चळवळ होती. औरंगाबादच्या इंटरमिजिएट कॉलेजात प्रार्थना म्हणून निजामाला उद्देशून त्याचे कुटुंब आणि साम्राज्य सदैव अबाधित राहो, अशी उर्दू दुवा म्हणण्याचा नियम होता. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधीच रोष होता.
त्यात शिक्षक म्हणून रुजू झालेले गोविंददास श्रॉफ यांना सरकारविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेऊन बडतर्फ केल्याची घटना घडली. हिंदू आणि मुस्लिम धर्मीय विद्यार्थ्यांना वेगळी वागणून मिळणे हे आणखी एक कारण.
या सर्वांचा परिपाक होऊन १४ नोव्हेम्बर १९३८ रोजी विद्यार्थ्यांनी "वंदे मातरम" गाण्यास सुरुवात केली. आणि तिथूनच वंदे मातरम चळवळीची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी संप पुकारला, अन्नत्यागही केला. ही चळवळ पुढे वेगाने पसरली.
हैदराबादचे उस्मानिया विद्यापीठ, हे संस्थानातील एकमेव विद्यापीठ होते, तिथेही ही चळवळ पोचली आणि बघता बघता संपूर्ण राज्यातील महाविद्यालये ओस पडली. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केलं, आणि शेकडो मुलांनी आपलं शिक्षण पणाला लावलं.
या चळवळीने अनेक तरुण घडवले, पण त्यातल्या एकाची गोष्ट जरा वेगळीच आहे.
रामचंद्रराव वाविलाला नावाचा हा तरुण. मूळचा तेलंगणातील गडवालचा. उस्मानिया विद्यापीठाच्या या धगधगत्या दिवसांत तो आंदोलनात होता, आणि पुढे १९३९ साली सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्याला अटक झाली. हैदराबादच्या कुप्रसिद्ध चंचलगुडा तुरुंगात त्याची रवानगी झाली.
तुरुंगात असताना त्याने रोजच वंदेमातरम गाण्याचा सपाट लावला, तेव्हा त्याला चाबकाचे फटके देण्यात आले, प्रत्येक फटक्यागणिक त्याने पुन्हा पुन्हा 'वंदे मातरम'चा जयघोष केला. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या तरुणाचे नाव वंदेमातरम रामचंद्रराव असे ठेवले. ज्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, त्यालाच नामरूपी आभूषण म्हणून मिरवण्याचे भाग्य या तरुणाला मिळाले.
पुढे या माणसाची कहाणी संपली नाही. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनातही ते सक्रिय होते आणि पुन्हा तुरुंगात गेले. आणि मुक्तिसंग्रामाच्या अखेरच्या टप्प्यात, १९४७ नंतर ते भूमिगत राहून निजामाच्या सैन्याची गुप्त माहिती गोळा करत होते आणि ती हैदराबादेतील भारताचे तत्कालीन एजंट-जनरल के. एम. मुन्शी यांच्यापर्यंत पोहोचवत होते. निजाम सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला आणि तो खटला चालू असताना त्यांची रवानगी झाली त्याच चंचलगुडा तुरुंगात.
पुढे हैदराबाद संस्थान भारतात विलीन केल्यानंतर हे वंदेमातरम रामचंद्रराव विकाराबाद येथून तीनवेळा आमदार निवडून आले होते.
या वंदेमातरम चळवळीने मुक्तिसंग्रामाच्या यज्ञकुंडात नुसती समिधा टाकली नाही, तर त्या अग्नीला धगधगत ठेवणारे तरुण हात घडवले. १९३८ पर्यंत हा लढा मुख्यतः काही मोजक्या नेत्यांपुरता, सभा-संमेलनांपुरता आणि निवेदनांपुरता मर्यादित होता. पण वंदेमातरम चळवळीने पहिल्यांदा सामान्य विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणलं.
जे तरुण त्या दिवसांत आपले वर्ग सोडून बाहेर पडले, ज्यांनी शिक्षण पणाला लावलं, ज्यांची हकालपट्टी झाली आणि जे नागपूर-जबलपूरला जाऊन शिकून पुन्हा हैदराबादेत परतले, तेच पुढची दहा वर्षं या लढ्याचा कणा बनले.
ज्या गोविंददास श्रॉफ यांच्या बडतर्फीने या आंदोलनाची एक ठिणगी पडली, तेच पुढे गोविंदभाई श्रॉफ म्हणून मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाचे अध्वर्यू ठरले, भूमिगत चळवळीचे सूत्रधार बनले. एका विद्यार्थी आंदोलनातून निघालेला माणूस एका सशस्त्र प्रतिकाराचा शिल्पकार व्हावा, यापेक्षा या चळवळीच्या परिणामाचा दुसरा पुरावा तो काय असणार?
आणि हे एकच उदाहरण नाही, त्या पिढीतले अनंत भालेराव, दिगंबरराव बिंदू, माणिकचंद पहाडे असे कित्येक जण पुढे स्टेट काँग्रेसच्या, महाराष्ट्र परिषदेच्या आणि सत्याग्रहाच्या आघाडीवर उभे राहिले. वंदेमातरम चळवळ ही त्या सर्वांची पहिली शाळा होती.
आणि म्हणूनच 'वंदे मातरम' हे या लढ्यातलं नुसतं स्फूर्तीगीत राहिलं नाही, ते या लढ्याचं प्रतीक, स्वाभिमान बनलं. तुरुंगात जाताना तोंडी हेच शब्द, मोर्चात घोषणा देताना हेच शब्द, आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामी सत्तेचा अंत झाल्यावर गावागावांत उमटलेला जयघोषही हाच.
निजामाने ज्या दोन शब्दांना 'जातीय' ठरवून बंदी घातली, त्याच दोन शब्दांनी त्याच्या राज्याच्या शेवटाची घोषणा केली. औरंगाबादच्या कॉलेजात, उस्मानियाच्या वसतिगृहात १९३८ साली उमटलेला तो सूर पुढे दहा वर्षं मराठवाड्याच्या मातीत घुमत राहिला आणि ज्या दिवशी मराठवाडा मुक्त झाला, त्या दिवशी तो सूर विजयाचा नाद बनून परत आला.
– आशुतोष (इडलीवाला अण्णा)
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अशाच काही अज्ञात, विस्मृतीत गेलेल्या घटनांचं वर्णन मी दररोज संध्याकाळी एका लेखातून १७ सप्टेंबरपर्यंत करणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ही अज्ञात गाथा तुम्हाला रोज वाचायला मिळेल. माझ्या अनुदिनीवर (ब्लॉगवर), थ्रेड्सवर आणि व्हॉट्सअप चॅनेलवर.
मला फॉलो करून ठेवा, हैदराबाद आणि मराठवाड्याच्या इतिहासातील अनेक कोपरे उलगडण्याचा मी प्रयत्न करत आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील काही घटनांचा वेध घेणारी एक लेखमालिका मी लिहित आहे मित्रांनो, निजामाच्या अन्यायकारक जोखडातून मराठवाडा आणि हैदराबाद मुक्त झाले, हा मुक्तिसंग्राम अनेक रोमांचकारक घटनांनी रंजीत आहे.
अशाच काही अज्ञात घटनांची माहिती मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे, ही मालिका वेळ काढून एकदा नक्की वाचा. मुक्तिसंग्रामाशी संबंधित इतर माहिती मी यापूर्वीही लिहित आलेलोच आहे...
एक्स, थ्रेड्स, ब्लॉग आणि व्हॉट्सॲप या चारही ठिकाणी माझे लेख आहेतच...
मराठवाडा मुक्तिसंग्राम हा केवळ १३ महिन्यांचा, चार दिवसांच्या ऑपरेशन पोलोपुरता लढा नव्हता.
हा लढा काही दशकांआधीच निजामी अन्याय अत्याचाराविरुद्ध सुरु झालेल्या शेकडो चळवळी, आंदोलने, दंगली, बलिदान यांनी रंगलेला आहे.
गेल्या वर्षी मी गोदावरीबाई टेके, निजामावर बॉम्ब फेकणारे नारायणराव पवार यांवरती लेख प्रकाशित केले होते. मुक्तिसंग्रामातील अशाच अज्ञात, विस्मृतीत गेलेल्या घटना आणि नाव नसलेले हुतात्मे यांची माहिती देणारे लेख मी लिहीत आहे.
हे लेख उद्यापासून रोज संध्याकाळी, एक एक करत, १७ सप्टेंबरपर्यंत मी प्रकाशित करणार आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ही अज्ञात गाथा तुम्हाला रोज वाचायला मिळेल. माझ्या अनुदिनीवर (ब्लॉगवर), थ्रेड्सवर आणि व्हॉट्सअप चॅनेलवर.
मला फॉलो करून ठेवा, हैदराबाद आणि मराठवाड्याच्या इतिहासातील अनेक अल्पज्ञात कोपरे उलगडण्याचा, तुम्हा सर्वांपर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम - लेख 3 -
हुतात्मा गोविंदराव पानसरे: जनक्षोभाची ठिणगी
मराठवाडा मुक्तिसंग्राम हा निजामी अत्याचारांविरुद्ध जनतेने दिलेला लढा, त्यात जनतेचा आक्रोश होता. अनेक प्रकारे जुलूम केले जात असताना जनतेच्या मनात असंतोष खदखदत असतो, त्या असंतोषाला केवळ आणखी एका अत्याचाररुपी ठिणगीची गरज असते. एक अशी ठिणगी पडली की मनात दडलेल्या त्या असंतोषाचा उद्रेक व्हायला वेळ लागत नाही. त्याचे उदाहरण म्हणजे हुतात्मा गोविंदराव पानसरेंचा खून.
गोविंदराव पानसरे हे स्टेट काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, मुधोळ, शेजारच्या निजामाबाद आणि आदिलाबाद जिल्ह्यातील अनेक तालुके हे त्यांचे कार्यक्षेत्र. त्यांना मराठी, हिंदीप्रमाणेच तेलुगूही येत असे. याच भागात त्यांनी महाराष्ट्र परिषद व स्टेट काँग्रेसची सभासदनोंदणी फार मोठ्या प्रमाणावर केली. लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी ते जवळजवळ दररोजच निजामी शासनाशी भांडत असत. रेसिडेंट, व्हाइसरॉय आणि हैदराबादच्या पंतप्रधानांना त्यांचं आठवड्यातून एक तरी पत्र किंवा तार जात असे. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचा त्यांना मनस्वी तिरस्कार होता. मुधोळच्या तहसीलदाराने म्हैसा येथील व्यापाऱ्यांकडून लाच घेतल्याचं कळताच त्यांनी सर्वत्र अर्ज करून त्याचा अक्षरशः घाम काढला.
पानसरेंचे कार्य इत्तेहादुल मुसलमीन आणि निजाम सरकार यांच्या डोळ्यात खुपू लागले होते.
पानसरेंनी मुधोळ तालुक्यातील कोंडलवाडी येथे एका सभेत भाषण केलं. सरकारला ते आक्षेपार्ह वाटलं आणि त्यांना १४ ऑक्टोबर १९४६ रोजी अटक करण्यात आली. साधारणपणे अशा प्रकरणांत सरकार अटक करून जामिनावर सोडून देत असे, पण पानसरेंना जामिनावर सोडू नये अशी पोलिसांनी भूमिका घेतली. त्यांना पोलीस कोठडीतच ठेवण्यात आलं. शेवटी २१ ऑक्टोबरला बिलोली कोर्टाने त्यांना जामिनावर सोडलं.
नेमक्या त्याच दिवशी कोंडलवाडीला इत्तेहादुल मुस्लिमीनची सभा ठेवण्यात आली होती. पानसरे केव्हा सुटणार याचा त्यांना अंदाज होता. त्या सभेत इत्तेहादच्या नेत्याने पानसरेंविरुद्ध प्रक्षोभक भाषण करून, "तुम्ही असताना तो जिवंत राहतो कसा," अशी उघड फूस दिली.
कोर्टाचं काम संपवून पानसरे बैलगाडीने कोंडलवाडीकडे निघाले. सोबत हंगरग्याचे कार्यकर्ते पुंडलिक पाटील आणि माधवराव मेणकुदळे होते. गाडी अर्जापूरनजीक पोहोचली आणि त्यावेळी रझाकारी मुसलमीनची एक माथेफिरुंची टोळी त्यांना आडवी आली "तुमच्यात पानसरे कोण आहे?" अशी त्यांनी विचारणा केली आणि त्या दोघांवर तलवारीने हल्ला केला.
आणि इथे जे घडलं ते विलक्षण होतं. पुंडलिक पाटील या तरुणाने पानसरेंच्या अंगावर पडत सर्व वार आपल्या पाठीवर झेलले. हे पाहून पानसरे ओरडले "मी पानसरे आहे. तो नव्हे. तुम्हाला मारायचे असेल तर मला मारा." असं म्हणायचा अवकाश, की पानसरेंवर तलवारीचे एकामागून एक वार झाले. गोविंद पानसरे हुतात्मा झाले.
हा हल्ला शासन संगनमताने पूर्वनियोजित होता. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा देह परत धर्माबादला नेऊ द्यायचा नाही आणि बेवारशी म्हणून तिथेच विल्हेवाट लावायची अशीही तयारी नांदेडच्या डीएसपीने केलेली होती. शेवटी घाईत बिलोली मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतरही पानसरेंचा छळ थांबला नाही.
पानसरेंचा खून तर झाली, परंतु त्यांच्या मृत्यूनेच मराठवाड्यात एक प्रचंड तुफान निर्माण केलं. त्यांच्यामागून हुतात्म्यांची एक मालिकाच तयार झाली.
गोविंदराव पानसरेंच्या हौतात्म्याचे प्रतिध्वनी संपूर्ण मराठवाड्यातच नव्हे, तर खुद्द हैदराबाद शहरात आणि तेलंगण व कर्नाटकातही उमटले. सर्वत्र मोठमोठ्या निषेध सभा झाल्या, ठराव झाले. तरुणांमधील असंतोष अनेक मार्गांनी व्यक्त झाला. हा खून निजाम सरकारला खूप महागात पडली.
अर्जापूरला खुनाच्या जागी लोकांनीच एक दगड ठेवून, शेंदूर लावून स्मारक उभारलं. खून सोमवारी झाला होता, म्हणून दर सोमवारी तिथे शेकडो लोक जमू लागले, लोकांनी सोमवारचे उपवास धरले आणि जणू त्या जागेला यात्रेचे स्वरूप आले. दर सोमवारी पानसरेंचा आत्मा तिथे येतो अशी अफवा आसपासच्या क्षेत्रात पसरली आणि लोकांचे जथ्थे तिथे दर्शनाला येऊ लागले.
अशाच एका सोमवारी, ६ जानेवारी १९४७ रोजी अर्जापुरी प्रचंड यात्रा जमली. सरकारी अंदाजानुसार दहा-पंधरा हजार, इतरांच्या मते चाळीस हजार ते लाखभर लोक. बिलोलीचा फौजदार जैदी याने ही यात्रा बंद करूनच दाखवण्याची प्रतिज्ञा केली होती. सायंकाळी चारपर्यंत सर्व सुरळीत होतं, पण जैदीने पोलिसांची व्हॅन लोकांच्या अंगावरच घातली आणि गोळीबार सुरू केला. पोलीस चार जणांचा जीव घेऊन बिलोलीस पळून गेले.
सरकारने हे पाप लपवण्याचा कसून प्रयत्न केला, पण काँग्रेसच्या चौकशी समितीने तपशीलवार चौकशी करून सरकारच्या जातीयवादाचे पुरते वाभाडे काढले.
पानसरेंच्या खुनात नांदेडजवळच्या उमरीचा तत्कालीन फौजदार बद्रुद्दीन याचा हात होता. तो नंतर परभणी जिल्ह्यातील बोरी येथे बदलून आला आणि त्याने तिथेही दडपशाही सुरू केली.
त्याचा काटा काढण्यासाठी स्टेट काँग्रेसच्या परभणी जिल्हा केंद्राने मनमाड येथील बैठकीत एक गुप्त योजना आखली. आनंदराव कौसडीकर, मधुकर औंढेकर आणि द. रा. मेढेकर या तीन तरुण सैनिकांना दोन पिस्तुलं आणि सात हँडग्रेनेड देण्यात आले. लपत-छपत, बतावणी करत ते मनमाड-रोटेगावमार्गे सेलूला उतरले आणि आडमार्गाने १४ डिसेंबर १९४७ रोजी सायंकाळी बोरीला पोहोचले.
रात्री साडेआठच्या सुमारास बद्रुद्दीन घरासमोरच्या ओट्यावर बसला असताना, दोघे त्याच्या अगदी जवळ गेले आणि लागोपाठ गोळ्या झाडल्या. तो टेबलाआड लपला, तेव्हा दुसऱ्याने आणखी दोन गोळ्या झाडून हँडग्रेनेड फेकलं. तिसऱ्याने पोलीस ठाण्याच्या दिशेने ग्रेनेड फेकलं. एकच धुमाकूळ माजला आणि त्या गडबडीत तिघेही पसार झाले. पाठलाग होऊनही कोणी हाती लागलं नाही. बद्रुद्दीन जबर जखमी झाला आणि दीड महिन्यानंतर दवाखान्यातच मरण पावला.
आज अर्जापूरच्या त्या मैदानाला 'पानसरे मैदान' असं नाव पडलं आहे. तिथे त्यांची समाधी आहे, शासनातर्फे हुतात्मा स्मारक आहे, त्यांच्या नावे महाविद्यालय आणि हायस्कूल आहे.
पण त्यापेक्षाही मोठं स्मारक जनतेच्या हृदयात निर्माण झालं. गोविंद पानसरेंच्या हत्येच्या बातम्या पसरताच अवघा मराठवाडा पेटून उठला, अन्यायाविरुद्धचा जनतेचा रोष अत्यंत तीव्र झाला आणि याच प्रचंड जनक्षोभाच्या व विद्रोहाच्या आगीत अवघ्या काही काळातच क्रूर निजाम सरकारचा कायमचा अंत झाला.
– आशुतोष (इडलीवाला अण्णा)
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अशाच काही अज्ञात, विस्मृतीत गेलेल्या घटनांचं वर्णन मी दररोज संध्याकाळी एका लेखातून १७ सप्टेंबरपर्यंत करणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ही अज्ञात गाथा तुम्हाला रोज वाचायला मिळेल. माझ्या अनुदिनीवर (ब्लॉगवर), थ्रेड्सवर आणि व्हॉट्सअप चॅनेलवर.
मला फॉलो करून ठेवा, हैदराबाद आणि मराठवाड्याच्या इतिहासातील अनेक कोपरे उलगडण्याचा मी प्रयत्न करत आहे.
इंजिनियर झाल्याची सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे कुठल्याच गोष्टीचा निवांत आनंद घेता येत नाही.
गाडी चालवतोय तर वेग, अंतर, गाडीचे मायलेज असे शंभर गणितं डोक्यात सुरु रहातात. पुलावरून जाताना खालच्या खांबांकडे बघतो, इमारत दिसली नाही की तिचं क्षेत्रफळ मोजतो. कुठलंही ऍप उघडलं की 'हे पाठीमागे कसं काम करत असेल' हा विचार आपोआप सुरू.
कुठल्याही गोष्टीत बाकीच्यांना ती प्रत्यक्ष गोष्ट दिसते. आम्हाला दिसते प्रक्रिया, त्या मागचं गणित, मागचं डिझाईन...
इंजिनियर असणं हा शाप आहे की वरदान, हे अजून ठरवता आलेलं नाही. पण तो कधी संपू नये एवढंच वाटतं.
आयुष्य जगण्याच्या स्पर्धेत मी कितपत यशस्वी होईन माहीत नाही, पण अनेक वर्षे घालवून घडवलेल्या माझ्या 'इंजिनियर' आत्म्याला मात्र कधी संपू देणार नाही.
काहीही झालं तरी आपल्यातला इंजिनियर जिवंत राहायला पाहिजे.!
सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा.
मराठवाडा मुक्तिसंग्राम - लेख २ -
गणेशोत्सव आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम
गणेशोत्सव साजरा करणे हा मराठवाड्यात एकेकाळी राजद्रोह ठरू शकत होता. राजकीय आणि सामाजिक जागृती व्हावी या उद्देशाने टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याचे लोण मराठवाड्यात पोचले नसते तर नवलच.
निजामाच्या आधिपत्याखाली असलेला मराठवाडा सामाजिक पार्शवभूमीवर भारताच्या इतर क्षेत्रांपेक्षा जरास अलिप्त राहिला असता. १८९३-९४ दरम्यान लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव पुढे एक दोन वर्षांतच मराठवाड्यात आणि खुद्द हैदराबाद शहरात पोहोचला. गणेशोत्सव मराठवाड्यात विशेषतः संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) शहरात सुरु झाला. हैदराबाद शहरातील शिवराम शास्त्री गोरे यांनी सुरु केलेला शालीबंडा, चादरघाट येथील गणेशोत्सव देखील याच काळात सुरु झालेला.
गणेशोत्सवाचा मोठा परिणाम झाला तो टिळकांच्या औरंगाबादभेटी दरम्यान. १९०१ दरम्यान ताई महाराजांच्या दत्तक विधान प्रकरणात लोकमान्य टिळक औरंगाबादला आले. या काळात लोकमान्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. लोकमान्य टिळक औरंगाबादला आल्यामुळे स्थानिक मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळाली आणि त्या भेटीनंतर तिथे सार्वजनिक उत्सवाची बीजं अधिक घट्ट रुजली.
टिळकांच्या स्वदेशी आणि बहिष्कार चतुःसूत्रीचा प्रभाव इथेही दिसू लागला. १९०८ मध्ये टिळकांना राजद्रोहाखाली सहा वर्षांची मंडालेत शिक्षा झाली, तेव्हा मराठवाड्यात हा उत्सव पसरत होता. प्रतिकूल परिस्थितीतही टिळकांच्या शिक्षेच्या निषेधार्थ गंगापूर, औरंगाबाद, जालना व परभणीत विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकून निदर्शने केली. निजामाबाद, हैदराबाद, रायचूर, गुलबर्गा व बीदरमध्येही याचे पडसाद उमटले. पुढे अनंत कान्हेरे यांनी केलेला जॅक्सनचा वध ही याच असंतोषाची तीव्र प्रतिक्रिया होती.
हा काळ म्हणजे सहावा निजाम मीर मेहबूब अली याचा उत्तरार्ध, त्यामुळे वातावरण अनुकूल नसले तरी काही खटपटी करण्याला भरपूर वाव होता. याच काळात हैदराबादमधील विवेक वर्धिनी (१९०७) आणि गुलबर्ग्यातील नूतन विद्यालय (१९०८) या शैक्षणिक संस्था स्थापन होऊ शकल्या. पुढे आलेल्या सातव्या निजामाच्या काळात तर अशा संस्थांवर सरसकट बंदी आली असती.
गणेशमंडळांतून एकत्र आलेल्या लोकांनी वाचनसंस्कृती उभी केली. टिळकांच्या निधनाच्या दिवशी, १ ऑगस्ट १९२० रोजी औरंगाबादमध्ये बलवंत वाचनालय स्थापन झाले, जे पुढे आनंद कृष्ण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली देशभक्तीचे केंद्र बनले. तसेच कंधारचे शारदा वाचनालय (१९४१), बीडचे साहित्य निकेतन, अंबेजोगाईचे वाचनालय (१९४५) व वैजापूरचे वैजनाथ वाचनालय यांसारख्या अनेक वाचनालयांची मराठवाड्यात स्थापना झाली.
१९०५-१९०७ च्या काळात हैदराबादेत हनुमान व्यायामशाळा सुरू झाली. देशभक्तीचा भाग म्हणून बलोपासना मानल्याने आखाडे व व्यायामशाळा देशभक्तीची केंद्रे बनली. पुण्याहून आलेले दत्तो अप्पाजी तुळजापूरकर आणि श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ही चळवळ संपूर्ण हैदराबादेत आणि मराठवाड्यात पसरवली.
लातूर, औसा, नळदुर्ग यांसारख्या छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत, जवळपास प्रत्येक तालुक्यात एक तरी व्यायामशाळा किंवा आखाडा उभा राहिला. याच काळात गावोगावी मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळाही उभ्या राहू लागल्या. काही ठिकाणी तर सरकारी परवानगीविना शाळा सुरू केल्याबद्दल खटलेही भरले गेले, तरी लोकांनी हे प्रयत्न सोडले नाहीत.
१९३०-४० च्या दशकात रझाकारांच्या हल्ल्यांच्या भीतीमुळे औरंगाबाद, नांदेड व हैदराबादमध्ये आखाड्यातील तरुण गणेशमंडपांचे रक्षण करत. निजाम सरकारने गणेशोत्सवावर कडक निर्बंध लादले; सार्वजनिक गणपतीसाठी पोलीस आयुक्तांची किंवा जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य केली आणि भाषणे व गाण्यांची यादी सादर करणे बंधनकारक केले. पुढे विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवण्यास व मशिदींसमोरून मिरवणूक नेण्यास बंदी घालून उत्सव दडपण्याचा प्रयत्न झाला.
याशिवाय, १९२१ च्या गश्ती निशाण ५२ अन्वये सभा, मिरवणुका, व्यायामशाळा, आखाडे, खासगी शाळा व ग्रंथालयांवर परवानग्यांची सक्ती लादली गेली. तसेच १९२९ च्या गश्ती निशाण ५३ द्वारे पूर्वपरवानगीशिवाय राजकीय सभा घेण्यावर बंदी घालून, उल्लंघन करणाऱ्यास २०० रुपये दंड किंवा १ महिन्याच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली.
निजाम स्वतःच्या फर्मानात 'माझा देश आणि माझी प्रजा' असे शब्द वापरत असला, तरी त्याच प्रजेने सुरु केलेल्या एका वाचनालयाला, एका आखाड्याला तो इतका घाबरत होता, यापेक्षा सामाजिक ताकदीचा दुसरा पुरावा तो काय असणार? आणि तरीही हे लोण थांबलं नाही. निजामाने कितीही फर्मानं काढली, तरी वाचनालयांची, व्यायामशाळांची, विद्यालयांची संख्या वाढतच राहिली.
याच वाचनालयांतुन बंदी असणारी पुस्तके चोरून वाचणारा एखादा तरुण, याच विद्यालयांतून शिकणारे कित्येक विद्यार्थी, याच आखाड्यांत कुस्तीच्या डावांबरोबर देशभक्तीचे धडे गिरवणारा एखादा पैलवान, याच व्यायामशाळांत शरीर कमावता कमावता मनगटात एक वेगळाच जोश साठवणारा एखादा कार्यकर्ता, पुढे मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात उतरला, तेव्हा त्याच्या हातातलं शस्त्र नवं असेल, पण मनातली जिद्द याच गणेशमंडपांतून, याच वाचनालयांतून घडलेली होती.
सार्वजनिक गणपती बसवणं ही निव्वळ धार्मिक कृती राहिलीच नव्हती. ते एक सामाजिक अस्त्र बनलं होतं. या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या मंडपाखाली मुक्तिसंग्रामाचा पाया घातला जात होता.
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अशाच काही अज्ञात, विस्मृतीत गेलेल्या घटनांचं वर्णन मी दररोज संध्याकाळी एका लेखातून १७ सप्टेंबरपर्यंत करणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ही अज्ञात गाथा तुम्हाला रोज वाचायला मिळेल. माझ्या अनुदिनीवर (ब्लॉगवर), थ्रेड्सवर आणि व्हॉट्सअप चॅनेलवर.
मला फॉलो करून ठेवा, हैदराबाद आणि मराठवाड्याच्या इतिहासातील अनेक कोपरे उलगडण्याचा मी प्रयत्न करत आहे.
– आशुतोष (इडलीवाला अण्णा)
संदर्भ:
हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा - अनंत भालेराव
मराठवाडा मुक्तिसंग्राम - लेख १ - नळदुर्गची घटना
१३ सप्टेंबर १९४८ - पहाटेच्या चार वाजता मराठवाड्याच्या मातीत एका निर्णायक लढ्याची सुरुवात झाली. निझामी अन्यायाच्या अंधारी रात्र झुगारून स्वातंत्र्यरुपी सुवर्ण प्रभात जीवित करणारा हा लढा, ऑपरेशन पोलो. दोन-अडीचशे वर्ष जुनं, बलाढ्य हैदराबादच्या निजामाचे साम्राज्य अवघ्या १०९ तासांच्या लढाईत नष्ट करणाऱ्या लढाईची ही नांदी.
१३ सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्य हैदराबादवर पाच दिशांनी चाल करून गेले. त्यातील पहिली आणि मुख्य तुकडी सोलापूर वरून कूच करून सिकंदराबादच्या दिशेने निघाली. तिचे पहिले लक्ष्य तुळजापूर, पहिल्या तासाभरातच रझाकारांच्या ताब्यातून हस्तगत झाले. इथून पुढे मात्र एक महत्वाचा टप्पा होता - नळदुर्ग.
खंदक खोदून पाण्याने वेढलेला आणि दुहेरी तटबंदी असलेला भुईकोट किल्ला नळदुर्ग. नळदुर्ग किल्ल्याच्या शेजारूनच हैदराबाद कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक महत्वाचा पूल लागतो. भारतीय सैन्य हैद्राबादेत प्रवेश करण्याआधी त्यांच्या मार्गांवर लागणारे महत्वाचे पूल उध्वस्त करून सैन्याला वाटचाल करताना अडचणी येतील अशी योजना निजामी लष्कराने आखली. त्याची जबाबदारी दिली होती ब्रिटिशांचा भाडोत्री सैनिक लेफ्टनंट टी. टी. मूर (T.T.Moore) याकडे. बरोबर, निजामाचे सैन्य इतके कुचकामी होते की अशी महत्वाची कामगिरी देखील भाडोत्री ब्रिटिश सैनिकांकडे सोपवण्याची नड भासावी.
मूरचा घात एका गोष्टीने केला, इंटेलिजन्स. या 'टी. टी. मूर'ला मिळालेल्या गुप्त माहिती (Intelligence) नुसार भारतीय सैन्य १५ सप्टेंबरच्या सकाळी हैद्राबादेत प्रवेश करणार होते. त्यानुसार त्याने तयारी ठेवली. पण भारतीय सैन्याने त्याचा ठोकताळा साफ चुकवला. त्या माहितीच्या विरुद्ध भारतीय सैन्य दोन दिवस आधीच सोलापूर कडून चाल करून आले.
याच घाईगडबडीत, भारतीय सैन्य नळदुर्गवर पोचण्या आधीच, तो पूल उध्वस्त करण्यासाठी निघालेला 'टी. टी. मूर' , स्फोटकांनी भरलेल्या त्याच्या जीपसह रस्त्यातच पकडला गेला.
रस्त्यातले पूल उडवून देण्याचा घाट उधळला गेला. नळदुर्गचा पूल सुरक्षित राहिला. या एका चुकीच्या माहितीमुळे मराठवाड्याच्या इतिहासाची दिशा ठरली. सकाळी ९ वाजता नळदुर्गला पोचलेले भारतीय सैन्य रस्ता मोकळा होताच पुढे उमरग्या पर्यंत जाऊन धडकले. पुढे तीनच दिवसांत या सैन्याने हैदराबाद शहर देखील आपल्या नियंत्रणात आणले.
मूरचा बेत यशस्वी झाला असता, तर भारतीय सैन्याला हैदराबादेत विनासायास प्रवेश करता आला नसता. ऑपरेशन पोलो लांबलं असतं, रझाकारी सैन्याचा आणि ब्रिटिश भाडोत्र्यांचा प्रतिकार अधिक बळावला असता. जी लढाई अवघ्या १०९ तासांत संपली, ती कदाचित आठवडे चालली असती. आणि त्या अतिरिक्त दिवसागणिक मराठवाड्याच्या मातीने आणखी नुकसान पाहिलं असतं.
इतिहास घडवणाऱ्या घटना काही नेहमीच रणांगणातल्या युद्धात घटित होत नाहीत, नळदुर्गच्या घटनेत अशी चुकीची माहिती होती. अनेक अज्ञात लघु-घटनांतून अशा मोठ्या परिणामांचे बीज रोवलेले असते. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास अशाच अनेक ज्ञात, अज्ञात रक्त-शृंगीत घटनांनी व्याप्त आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अशाच काही अज्ञात, विस्मृतीत गेलेल्या घटनांचं वर्णन मी दररोज संध्याकाळी एका लेखातून १३ ते १७ सप्टेंबरपर्यंत करणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ही अज्ञात गाथा तुम्हाला रोज वाचायला मिळेल. माझ्या अनुदिनीवर (ब्लॉगवर), थ्रेड्सवर आणि व्हॉट्सअप चॅनेलवर.
मला फॉलो करून ठेवा, हैदराबाद आणि मराठवाड्याच्या इतिहासातील अनेक कोपरे उलगडण्याचा मी प्रयत्न करत आहे.
- आशुतोष (इडलीवाला अण्णा)
संदर्भ:
हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा - अनंत भालेराव
British mercenaries’ futile bid to keep Hyderabad independent - (The Hindu - 16 Sep 2020)















